Uncategorized
सूर्याच्या नादी लागाल तर भस्मसात व्हाल.. टिकेला श्याम प्रजापतींचे सडेतोड उत्तर
- तुषार भारतीय यांनी स्वतःचा अंधार दूर करावा…..
अमरावती : अमरावतीचे विकास पुरुष डॉ.सुनील देशमुख यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासाचे व्हिजन मांडले होते. यावर भाजप नेते तुषार भारतीय यांनी टीका केली होती. त्या टीकेला अमरावती काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सूर्याच्या नादी लागल तर भस्मसात व्हाल, असा इशारा प्रजापती यांनी दिला आहे.
माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख यांनी नागपूरचा विकास म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विकास नव्हे, असा प्रश्न उपस्थित करत पश्चिम विदर्भावर सत्ताधाऱ्यांकडून कसा अन्याय सुरू आहे याची क्रमवार माहिती दिली होती. नागपुरात सुरू असणारी विकास कार्य अन् पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांवर सरकार कडून होत असलेला अन्याय यातील फरक सउदाहरण, पुराव्यानिशी त्यांनी स्पष्ट केला होता. मात्र ज्या अमरावतीला आज राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासाच्या प्रगतीपथावर नेले अशा डॉ. सुनील देशमुख यांच्यावर लायकी नसताना तुषार भारतीय यांनी टीका केली. त्या टीकेला काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी आतापर्यंत केवळ अमरावतीच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवले. विजनरी माणूस म्हणून सामान्यातला सामान्य अमरावतीकर आज त्यांचा ऋणी आहे. असे असतानाही भारतीय यांनी केवळ बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे डॉ. सुनील देशमुख यांच्यावर निष्कारण टीका केली. सूर्यावर जर कोणी टीका करत असेल तर भस्मसात होणे हा नियम आहे. काँग्रेस नेत्यांवर जर कोणी टीका करत असेल तर ती टीका आता खपवून घेतली जाणार नाही. कोणीही अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. असा दम सुद्धा शाम प्रजापती यांनी भारतीय यांना भरला आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या सामना होण्याची शक्यता आहे.