हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर होणार कारवाई

वाशिम:
सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणीक व इतर संस्थेमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तसेच कार्यालयीन अधिकारी/ कर्मचारी हे विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांश दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणीक व इतर संस्थेमध्ये येणारे नागरीक व कर्मचारी/अधिकारी यांनी हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधन करावे व हेल्मेट वापरण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात यावी. 9 मे 2022 पासून हेल्मेट परिधान न करणारे वाहन चालक तसेच वाहन मालकांविरुध्द परिवहन विभाग व पोलीस विभाग यांचेकडून तपासणी करुन मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई तसेच अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबीत करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.