हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्यावरून सहा जणांविरुद्ध शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरपूर जैन, (वा.). घराचे बांधकाम करण्यासाठी 50 हजार रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार केंद्रा ता. शेनगाव जि. हिंगोली येथील अश्विनी प्रदीप वाळले (20) या विवाहित महिलेने 11 मे रोजी शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, मला मुलगी झाल्यापासून घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावला. सदर रक्कम आणण्यास विवाहिता असमर्थ ठरत असल्यामुळे सासरच्या मंडळीने अश्विनीला मारहाण केली व शारीरिक तसेच मानसिक छळ केला. अश्विनी वाळले यांनी अखेर 11 मे रोजी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी प्रदीप दत्तराव वाळले, द्वारका दत्तराव वाळले, दत्तराव नारायण वाळले, रेणूका प्रभू पावडे, प्रभू विश्वनाथ पावडे, व पिंटू पावडे या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.